विद्यालयाचा मराठी विभाग अत्यंत सक्षम असून वर्षभरात अनेक उपक्रम आयोजित करीत असतो. शिक्षकांची मराठी विषय समिती असून त्या मार्फत प्रत्येक महिन्याला शिक्षक सभा घेऊन अध्यापनाचे नियोजन केले जाते. वर्षभरात होणाऱ्या अनेक वक्तृत्व, निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन मराठी विषयाचे सर्व शिक्षक करत असतात. २७ फेब्रुवारी रोजी मराठी दिन साजरा केला जातो. यावर्षी छावा चित्रपटाचे शस्त्रास्त्र सल्लागार विद्यालयाचा माजी विद्यार्थी मृण्मय अरबुने यांची मुलाखत श्री. भोज सर यांनी घेतली. त्याचबरोबर ‘मराठी बोला’ या विषयावर जनजागृती पर नाटिका किसनवीर चौक, वाई या ठिकाणी सादर करण्यात आली या उपक्रमास नागरिकांची पसंती मिळाली. विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत विद्यार्थी सहभागी झाले व त्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. स्नेहसंमेलनात सादर करण्यात आलेल्या ‘पडदा पाडा रे’ या नाटीकेस प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

दरवर्षी प्रमाणे कै. सत्यवती जोशी वक्तृत्व स्पर्धेत चांगला प्रतिसाद मिळाला. मराठी विश्वकोश कार्यालयास क्षेत्र भेट दिली व विश्वकोश निर्मिती कार्य विद्यार्थ्यांनी समजावून घेतले.